पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून “चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद केली आहे. ही “चेअर ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग हा भारतातील एकमेव विभाग आहे.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने लष्करी इतिहास व सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वसामान्य जनतेस माहिती मिळावी. तसेच लष्कराचे धोरण, राष्ट्रीय सुरक्षेसंबंधिची आव्हाने, युद्धविषयक नीती याबाबत राष्ट्रीय पातळीवर अभ्यास व्हावा, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी देशभरातील विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवले होते. यासाठी 100 विद्यापीठांकडून अर्ज केले होते. या सर्व प्रस्तावांतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभागास “चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
यापूर्वी संरक्षण व सामरिकशास्त्र विभागामध्ये भारतीय भूसेनेद्वारे 1994 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तसेच भारतीय वायुसेनेद्वारे फेब्रुवारी 2020 मध्ये “मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग’ यांच्या नावे “चेअर ऑफ एक्सेलन्स’ मिळाले आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाद्वारे विभागाला “चेअर ऑफ एक्सलेन्स’ मिळाल्यामुळे या विषयात विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी निर्माण झाली आहे, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी म्हटले आहे.
विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग हा देशातील एकमेव विभाग आहे. ज्यामध्ये भू-सेना, वायू सेना व संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयाने “चेअर ऑफ एक्सलेन्स’ची स्थापना केली आहे. पुढील काळात भारतीय नौसेनेसोबतही “चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा आमचा मानस असून यासाठीचा प्रस्तावही नौसेना मुख्यालयात पाठविला आहे.
– डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग