नगर -गेल्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत होते. परंतु गेल्या चोवीस तासांत रुग्णसंख्या कमी झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात 568 करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 612 रुग्ण बरे झाले आहेत. आजही सर्वाधिक 122 रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. तर पारनेर तालुक्याची रुग्णसंख्या मोठी घट झालेली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यात आठशेहून अधिक करोनारुग्ण एका दिवसाला वाढत होते. परंतु गेल्या चोवीस तासांत त्यात घट झाली आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील करोना लॅबनुसार 43, खासगी आरटीपीसीआर लॅबमध्ये 340 आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 185 रुग्ण आढळून आले आहेत.
त्यात नगर शहरात 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 122 रुग्ण बाधित आढळले आहेत. तर शेवगावला 64 रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्जतला 50 रुग्ण आढळून आले आहेत.
पारनेरला 38 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात अवघे 16 रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर ग्रामीणला 44 करोनाबाधित आढळले आहेत. आता जिल्ह्यात 6 हजार 57 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 6 हजार 389 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर 2.04 टक्के इतका झाला आहे. तर 96 टक्के बरे झाले आहेत.