पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करण्याचे आवाहन विविध स्तरांतून सातत्याने करण्यात येते. मात्र, अनेक नागरिक मास्कचा वापर नसल्याचे चित्र आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या या नागरिकांवर कारवाईचा बडगा रेल्वे प्रशासनाने उगारला आहे. मागील आठवडाभरात मध्य रेल्वेच्या 5 विभागांत सुमारे 878 विनामास्क वावरणार्या नागरिकांवर कारवाई केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील अनेक नागारिकांकडून मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेल्वे स्थानकांतील प्रवाशांची गर्दी देखील अधिक आहे. मात्र अनेक प्रवासी स्थानकाच्या आवारात आणि रेल्वेगाड्यांमध्ये विनामास्क वावरत असल्याचे चित्र होते. रस्त्यावर विनामास्क वावरणार्यांना पालिकेकडून मागील वर्षापासून दंड आकारण्यात येत होता.
मात्र रेल्वे स्थानकात याप्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिक देखील बिनधास्त वावरत होते. मात्र अखेरीस मागील आठवड्यापासून रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये विनामास्क वावरणार्या नागरिकांवर कारवाई करण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाने घेतला होता. 17 एप्रिलपासून या कारवाईला सुरूवात करण्यात आली.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांत सुमारे 878 जणांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांना 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला. या घटनांमध्ये एकूण 1 लाख 70 हजार 450 रुपये दंड आकारला आहे. यामध्ये भुसावळ विभागात सर्वाधिक कारवाई केली असून, पुणे विभागात केवळ 63 जणांवर कारवाई केली आहे.
विभागानुसार कारवाई
विभाग – घटना – आकारलेला दंड (रुपये)
पुणे – 63 – 12,700
मुंबई – 170 – 25,800
भुसावळ – 311 – 49,400
नागपूर – 267 – 62,750
सोलापूर – 67 – 19,800