मुंबई – कोळशाच्या आणि डिझेलच्या दरासह इतर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे पुढील काही दिवसात सिमेंटच्या दरामध्ये प्रति बॅगला 15 ते 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सिमेंटचे दर 400 रुपये प्रति बॅग या विक्रमी पातळीवर जाऊ शकतात असे क्रिसिल या संस्थेने म्हटले आहे.
एकूणच महागाई वाढत असल्यामुळे उत्पादनाचा खर्च जास्त आणि विक्रीची किंमत कमी अशा अवस्थेमध्ये सिमेंट कंपन्यांचा नफा प्रति टनाला 100 ते 150 रुपयांनी कमी होऊ शकतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळे ऑगस्ट महिन्यात सिमेंट कंपन्यांनी प्रति बॅगला 10 ते 15 रुपयांची दरवाढ केली आहे. त्यामध्ये आणखी 15 ते 20 रुपयाची वाढ झाल्यानंतर हे दर 400 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
अशा अवस्थेतही या आर्थिक वर्षात सिमेंटच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 ते 13 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कारण गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे सिमेंटचा वापर कमी झाला होता. गेल्या सहा महिन्यात आयात कोळशाच्या दरात 120 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे प्रति टन सिमेंट उत्पादनाचा खर्च 350 ते 400 रुपयांनी वाढला आहे.
महागाईपासून बचाव करण्यासाठी सिमेंट कंपन्यांनी पर्यायी इंधनाचा वापर केला आहे. तिमाहीसाठी लागणाऱ्या सिमेंटचा साठा तयार केला आहे. दीर्घ पल्ल्याची कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
डिझेलचे दर पाहता वाहतुकीचा खर्च प्रति टनाला 50 ते 75 रुपयांनी वाढला आहे. असे असले तरी पहिल्या सहा महिन्यांत सिमेंटची मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसऱ्या सहा महिन्यात तीन ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचे क्रिसिलच्या संचालक इशा चौधरी यांनी सांगितले. सरकारने पायाभूत सुविधाना चालना दिली आहे.
त्याचबरोबर घरांचे बांधकाम वाढत असल्यामुळे सिमेंटची मागणी वाढणार आहे. दक्षिण भारतात सिमेंटचे दर सर्वात जास्त प्रमाणात वाढले. त्यानंतर मध्य भारताचा क्रमांक लागतो. उत्तर आणि पश्चिम भारतात त्या तुलनेत सिमेंटच्या दरामध्ये कमी वाढ झाली आहे.