मुंबई – मारुती सुझुकी कंपनीबरोबरच ऑडी, मर्सिडीज या कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यानी दरवाढ जाहीर केली आहे. कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे दरवाढ करावी लागत असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे.
ही दरवाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे. इतर कंपन्या दरवाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे की, वेगवेगळ्या मॉडेलच्या किमती वेगवेगळ्या प्रमाणात वाढविल्या जाणार आहेत.
या अगोदर मारुती सुझुकी कंपनीने जानेवारी महिन्यात 1.4 टक्के, एप्रिल महिन्यात 1.6 टक्के, सप्टेंबर महिन्यात 1.9 टक्के दरवाढ जाहीर केली होती. कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, पोलाद, अल्युमिनियम, तांबे, प्लास्टिक आणि इतर धातूंच्या किमती वाढत असल्यामुळे दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही.
कारच्या निर्मितीत या धातूंचा सहभाग 80 टक्क्यांपर्यंत असतो. मागणी कमी असल्यामुळे आम्ही याअगोदर दरवाढ करण्याचे टाळले होते. मात्र आता मागणी पुरशी नसूनही दरवाढ करावी लागत आहे. दरवाढ टाळण्यासाठी आम्ही उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये पुरसे यश आले नाही.
आम्ही महागाई कमी होण्याची वाट पाहिली. मात्र महागाई कमी होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी पोलादाचा दर 38 रुपये प्रति किलो होता. तो आता 77 रुपये झाला आहे. गेल्या वर्षी ल्युमिनियमचा दर 1,800 डॉलर प्रति टन होता तो आता 2,800 डॉलरवर गेला आहे.
ऑडी कार उत्पादक कंपनीने आपल्या विविध मॉडेलच्या दरामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली असून ही दरवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. या कंपनीनेही कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे दरवाढ करावी लागत असल्याचे म्हटले आहे.
मर्सिडीज बेंझ इंडियाने आपल्या काही मॉडेलच्या दरात दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली. ही दरवाढ एक जानेवारीपासून लागू होईल. ज्या ग्राहकांनी अगोदरच नोंदणी केली आहे त्या ग्राहकांना ही दरवाढ लागू होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.