निवडक खरेदी वाढली; निर्देशांक उंचावले

स्थूल अर्थव्यवस्था बळकट झाल्याचा परिणाम

मुंबई – स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदार निवडक खरेदी करीत आहेत. परिणामी शेअर बाजार निर्देशांकांत आज सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 776 अंकांनी म्हणजे 1.35 टक्‍क्‍यांनी वाढून 58,461 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 234 अंकांनी वाढून 17,401 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बॅंक, इन्फोसीस, टीसीएस, पावर ग्रीड, सन फार्मा, टाटा स्टील, टेक महिंद्रा, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.

आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मात्र घट नोंदली गेली. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख नायर यांनी सांगितले की, राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याबरोबरच तूट कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. महागाई वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये आशादायक परिस्थिती असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली आहे. जागतिक बाजारात मात्र विक्रीचे वारे होते. 

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने भांडवल सुलभता कमी करून व्याजदरवाढीचे संकेत दिले आहेत. अमेरिकेमध्ये ओमायक्रॉनचा रुग्न आढळून आला आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि इतर देशातील शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते.

आज खरेदीचा जोर एवढा जास्त होता की, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, तेल आणि नैसर्गिक वायू, धातू, वित्तीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्राचे निर्देशांक उंचावले. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आधारित मिडकॅप आणि स्मॉलकॅप 1.12 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून मात्र विक्री चालूच असून या गुंतवणूकदारांनी काल 2,765 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

एलकेपी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक एस रंगनाथन यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यामध्ये विविध कारणामुळे अस्थिरता निर्देशांक वाढला होता. मात्र स्थूल अर्थव्यवस्थेची सकारात्मक आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अस्थिरता निर्देशांक बराच कमी झाला आहे.

तेजी-मंदीचा अंदाज

कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काही कार कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे. इतर कंपन्या लवकरच दरवाढ जाहीर करण्याची शक्‍यता आहे. अशा अवस्थेत वाहन कंपन्यांचा नफा वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे वाहन कंपन्यांचे शेअर नजीकच्या भविष्यात तेजीत राहण्याची शक्‍यता आहे.

शेअरखान या संस्थेचे तंत्रज्ञान विश्‍लेषक गौरव रत्नपारखी यांनी सांगितले की, निफ्टीने गेल्या दोन दिवसात चांगली वाटचाल केली आहे. मात्र विक्रीचा जोर वाढल्यास निफ्टीला 17,060 अंकावर चांगला आधार आहे. ओमायक्रॉन आगामी काळात कसे रूप धारण करतो यावर जागतिक आणि भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांची वाटचाल अवलंबून आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.