पुणे – महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, ती रोखण्यासाठी अनेक नागरिक थेट आत्महत्या करण्याची धमकीच अधिकाऱ्यांना व्हॉट्सऍप तसेच फोनवरून देत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारांमुळे बांधकाम विभाग तसेच अतिक्रमण नियंत्रण विभागाचे निरीक्षकही धास्तावले आहेत.
या कारवाईमध्ये साइड मार्जिंन, फ्रंट मार्जिन तसेच अनधिकृत बांधकामांच्या कारवाईचा समावेश आहे. शहरात अनेक नागरिक अनधिकृत बांधकामांच्या कारवाईच्या तक्रार करतात. अनेकदा या तक्रारी व्यक्तिगत तसेच व्यावसायिक स्वरूपातून असतात. त्याची खातरजमा करून मनपा प्रशासन कारवाईच्या नोटीस बजावते.
मात्र, या नोटीस जाताच अधिकाऱ्यांना धमकी देण्यास सुरुवात केली जात आहे. अधिकाऱ्यांचे व्हॉट्सऍप क्रमांक मिळवून या धमक्या दिल्या जात आहेत. धास्तावलेल्या अधिकाऱ्यांकडून या धमकीचे मेसेज तसेच पुराव्यांसह पोलिसांना पत्र दिले जात आहे. कारवाई झाल्यास अडचणीच्या भीतीने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.
कर्मचारीही देतात धमकी
दरम्यान, पालिकेतील अंतर्गत वाद तसेच बदल्यांवरून अधिकाऱ्यांना थेट आत्महत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशा धमक्या दिल्यानंतर स्थानिक राजकीय पदाधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांना घेऊन अधिकाऱ्यांची भेट घेत बदल्या रद्द करून धमकी प्रकरण मिटविण्यासाठी मदत करत आहेत.
त्यामुळे अधिकारीही घाबरून कर्मचाऱ्यांवरील कारवाई टाळत आहेत. मनपा दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस थेट वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली आहे. अशा प्रकरणांमध्ये आपली बदली केल्यास चिठ्ठी लिहून आत्महत्येचा इशारा कर्मचारी देत आहेत.