पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई मुलांसाठी नवे ऑनलाइन क्लासेस सुरू करणार आहे. हे वर्ग फिटनेसचे धडे देणारे ऑनलाइन वर्ग असतील. सीबीएसई आणि फिट इंडिया मिशन यांच्या वतीने हे ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. यात विद्यार्थ्यांना पोषण आहार, योगा आणि बेसिक व्यायाम शिकवले जाणार आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून यासंबंधिची माहिती दिली. हे फिटनेस वर्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह फिटनेस सेशन्स आयोजित केले जातील. हे ऑनलाइन वर्ग सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. या वर्गांचे मुख्य उद्दिष्ट ऑनलाइन वर्गांद्वारे विद्यार्थ्यांना पूर्णपणे फिट ठेवणे हा आहे. सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाइन वर्ग एक महिन्यापर्यंत होतील. सीबीएसईने यासंबंधीचे परिपत्रक शाळांना पाठवले आहे.
निकाल लांबणार….
लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर आता सीबीएसई निकालांना विलंब होण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याच्या विचारात आहे. मात्र, सीबीएसईकडून अद्याप याबाबतीत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. पण मूल्यांकन प्रक्रिया आणि काही
विषयांच्या परीक्षा थांबल्याने निकालांना विलंब होण्याची शक्यता आहे.