हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तुल अरबी समुद्राच्या तळातून शोधले
मुंबई – नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेले पिस्तुल सीबीआयने ठाणे जिल्ह्यातील खाडीच्या तळातून शोधून काढले आहे. त्यासाठी सीबीआयने विदेशातील संस्थांची मदत घेतली होती. त्यांनी समुद्राच्या तळाशी शोध घेऊन ते शोधून काढले आहे. पुण्यात 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.
या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने या पिस्तुलाची मोडतोड करून ते ठाण्या जवळील खाडीत फेकून दिले असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली होती. ठाण्याच्या खाडीत जे पिस्तुल सापडले होते तेच दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वापरले होते की नाही याची खातरजमा फोरेन्स्कि लॅबरोटरीतील तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली. मात्र या शस्त्राविषयी अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी 95 लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण 7.5 कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोपतरी प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान, आरोपी कळसकर याला त्याचे वकिल संजीव पुनाळेकर यांनी हे गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगण्यात येते. सध्या पुनाळेकर हेही अटकेत आहेत. हे सर्व आरोपी सनातन संस्थेशी संबंधीत आहेत. कळसकर याने पुण्याहून नालासोपरा येथे जाताना वाटेत ठाण्याच्या खाडीत हे शस्त्र टाकून दिले होते.