व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे देशातील महिलांना आवाहन
कॅराकस – देशातील महिलांनी अधिकाधिक मुले जन्माला घालावीत आणि देशाच्या उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकालोस मादुरो यांनी केले आहे. देशातील प्रत्येक महिलेने सहा मुले जन्माला घातली पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी देशाला उद्देशून दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात त्यांनी हे आवाहन केले.
सध्या व्हेनेझुएला हा देश आर्थिक अडचणीत आला असून त्यामुळे त्या देशांतील लाखो लोकांनी तेथून पलायन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.
या देशात सध्या जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येलाच अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा मिळत नसताना अध्यक्षांनी असे विक्षिप्त आवाहन करणे अयोग्य असल्याचे मत अनेक संघटनांनी व्यक्त केले आहे.
या देशातील मुलांना चांगले शिक्षण किंवा त्यांच्या आरोग्याच्याच सुविधा उपलब्ध नसताना अध्यक्षांनी असे बेजबाबदार आवाहन करणे निंदनीय आहे असे युवकांच्या हितासाठी काम करणाऱ्या त्या देशातील एका संघटनेचे संस्थापक ऑस्कर मिस्ले यांनी म्हटले आहे.
संयुक्तराष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक अडचणींमुळे आणि अन्य टंचाईमुळे व्हेनेझुएलातील किमान 45 लाख लोकांनी गेल्या पाच वर्षात त्या देशांतून अन्यत्र पलायन केले आहे. जगातील ज्या 93 लाख लोकांना पुरेसे अन्नही मिळत नाही त्यातील एक तृतीयांश लोकसंख्या एकट्या व्हेनेझुएला या देशांतील आहे.