उपमुख्यमंत्र्यांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडेबोल
पुणे – पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. शासनाने दिलेल्या नियमांची नीट अंमलबजावणी होत नाही.
दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त दिसत नाही. प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिकांची ये-जा सुरू आहे. दुकानांच्या वेळा, रस्त्यावर मास्क वापरत आहे का नाही, याकडे कोण लक्ष देत नाही. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडा, अशा शब्दांत पवार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
विभागीय आयुक्त कार्यालयात करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. करोनाबाधितांवर उपचार करताना अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश पवार यांनी यावेळी दिले.
या बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ये-जा करणाऱ्यांची तपासणी करा…
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात करोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील विविध समित्यांच्या मदतीने करोना संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी, तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमावा. कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी कारखाना मालकांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी. काम करताना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारीरिक अंतर पाळण्याच्या सूचना द्याव्यात, असेही पवार यांनी सांगितले.