सातारा – सातारकर करोनापासून सुरक्षित रहावेत यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून राबणाऱ्या सातारा पालिकेच्या प्रशासनाला गुरुवारी (दि. 2) रात्री जोरदार धक्का बसला. अधिकारी महिला करोनाबाधित झाल्याने पालिकेची संपूर्ण इमारत तीन दिवसांसाठी सील करण्याची आफत ओढवली. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची शुक्रवारी तारांबळ उडाली. या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून पालिका कार्यालयाच्या कानाकोपऱ्या निर्जंतुक करण्यात आला असून सोमवारपर्यंत पालिकेचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी तातडीने आदेश दिले. सातारा शहरात करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पालिकेचा आरोग्य विभाग व प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.
आरोग्य विभागाच्या कामामुळे व करोना वॉरियर्समुळे शहरात करोनाचा फैलाव नियंत्रणात होता; पुणे, मुंबई, कोल्हापूर व अन्य भागातून आलेल्या लोकांमुळे गेल्या काही दिवसात शहर परिसरात बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर प्रशासनाची डोकेदुखीही वाढत आहे.
पालिकेच्या कोव्हिड विभागात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या करोना चाचणीचा अहवाल गुरुवारी (दि. 2) रात्री पॉझिटिव्ह आल्याने पालिका प्रशासनावरच क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. या महिला अधिकाऱ्यास कोणतीही लक्षणे नसतानाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या हाय रिस्क कॉंटॅक्टमधील लोकांची माहिती दुपारपर्यंत घेण्यात आली.
प्रशासनावर दुहेरी संकट
संबंधित महिला अधिकाऱ्याबरोबर काम करणारे पंधरा ते वीस कर्मचारी क्वारंटाइन झाल्याने आरोग्य विभागाच्या कामाची घडी विस्कटली आहे. आता आरोग्य विभागाचा गाडा कोण हाकणार, असा प्रश्न आहे. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प झाल्याने पालिका प्रशासनाला दुहेरी संकटातून मार्ग काढावा लागणार आहे.
मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट
शहरातील बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यांवर भाजी व फळ विक्री करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. राजवाडा-मंगळवार तळे रस्ता, गोल बाग, मोती चौक, तहसील कार्यालय परिसर, बाजार समिती या ठिकाणी शुकशुकाट होता; परंतु बाजारपेठेतील गर्दी कमी झालेली नाही.
शासकीय अधिकारी हाय रिस्क कॉंटॅक्टमध्ये?
संबंधित महिला अधिकाऱ्यावर काही दिवसांपूर्वीच कोव्हिड कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हे काम झेपत नसल्याची आणि त्याहीपेक्षा योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार तिने नगराध्यक्षांकडे केली होती. करोना संदर्भात गेल्या काही दिवसांत तालुका प्रशासनाच्या काही महत्त्वाच्या बैठकांना ही महिला अधिकारी उपस्थित होती. पालिकेच्या काही विभागप्रमुखांसह अन्य शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या अधिकाऱ्याचा कामानिमित्त सतत संपर्क येत होता. त्यामुळे पालिकेचे मुख्य अभियंता, लेखापाल, कर्मचारी व इतर शासकीय अधिकारीही हाय रिस्क कॉंटॅक्टमध्ये आहेत. आता तालुका प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हाय रिस्क कॉंटॅक्टमधील पालिकेतील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन व तपासणी करण्यात येत आहे.
शहरात मायक्रो कंटेन्मेंट झोन वाढले
शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत आहे. पालिका कार्यालय सील करण्यात आले असून संबंधित महिला अधिकारी वास्तव्यास असलेली यादोगोपाळ पेठेतील इमारतही सील करण्यात आली आहे. त्या भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त झालेल्या प्रतापगंज पेठेत पुन्हा एक करोनाबाधित झाल्याने तेथेही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. रविवार पेठेतही गुरुवारपासून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागात राहणाऱ्या करोनाबाधित आडत व्यापाऱ्याचा गुरुवारी मृत्यू झाला होता. त्याच्या आईचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या भागात आरोग्य विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम सुरू केली होती.