पुणे – पुण्यात टोळक्यांचा धुडगुस सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री वारजे परिसरातील गाड्यांची कोयता गँगने तोडफोड केली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोयता गँगकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोळक्यांनी पुण्यातील तळजाई जवळील वनशिव जनता वस्ती परिसरात रिक्षासह तीस गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलीसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही का ? असा प्रश्ना निर्माण झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तळजाई परिसरात सहा जणांच्या टोळके तोंडाला रुमाला बांधून आले होते. तेव्हा त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्रे होती. दरम्यान टोळक्याने रस्त्याच्याकडेला लावलेल्या रिक्षा आणि इतर तीस वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.
याबरोबरच टोळक्याने आरडा-ओरडा करत परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सहकार नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.