पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहर परिसरात दुचाकी वाहने चोरणार्या इंटेरिअर डेकोरेटर तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. संबंधीत तरुण व्यसनाच्या अधिन गेल्याने त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
प्रशांत प्रभाकर कान्हेकर (४७, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. धनकवडीतील सावरकर चौक परिसरात एकजण संशयीतरित्या थांबला असून त्याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती अंमलदार अमोल पवार, विशाल वाघ यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कान्हेकरला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या तपासात दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. खाक्या दाखविताच त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९५ हजारांचा तीन दुचाकी जप्त केल्या. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बापू खुटवड, अमोल पवार , महेश मंडलीक, बजरंग पवार, नीलेश शिवतारे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.