पुणे : कात्रज भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचाी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.
कात्रज भाजी मंडई परिसरात एक जण रक्ताच्या थोरोळ्यात पडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर एक पिशवी पडली हाेती. सुरुवातीला मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. पिशवीतील कागदपत्रांवरून बागल यांची ओळख पटली.
पोलिसांनी बागल यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तेव्हा ते एकटेच राहत असल्याची माहिती मिळाली. खूनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे