उत्सवाच्या काळात आणखी वाढ शक्य
नवी दिल्ली – पहिल्या तिमाहीचा विकासदर उणे 23.9 टक्क्यांवर गेल्यामुळे हवालदिल झालेल्या सरकारला वाहन उत्पादन क्षेत्राने दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्याच कंपन्यांची विक्री वाढली असल्याची आकडेवारी कालपासून जाहीर होत आहे.
ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार एकूण कार विक्रीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच कार कंपन्यांच्या विक्रीत थोडीफार वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत मारुती सुझुकी कार कंपनीची विक्री 15.3 टक्क्यांनी वाढून 1,24,624 इतकी झाली आहे.
ह्युंदाई या कार कंपनीच्या विक्रीत ऑगस्ट महिन्यात 20 टक्क्यांची वाढ होऊन कंपनीने 38,205 कार विकल्या. आतापर्यंत पिछाडीवर असलेल्या टाटा मोटर्सची कार विक्री 24 टक्क्यांनी वाढून 18,583 इतकी झाली आहे. महिंद्रा कंपनीची कार विक्री चार टक्क्यांनी वाढून 13,651 इतकी झाली.
किया या कंपनीच्या कार विक्रीत 74 टक्के, रेनो कंपनीच्या विक्रीत 41 टक्के, एमजी कंपनीच्या विक्रीत 41 टक्के वाढ झाली. तर होंडा कंपनीच्या विक्रीत नऊ टक्के, टोयोटो कंपनीच्या विक्रीत 48 टक्के आणि फोर्ड कंपनीच्या विक्रीत 14 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंत कार विक्रीत एकतर्फी घट होत होती. मात्र, आता ग्राहक खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. व्याजदर कमी पातळीवर असल्यामुळे खरेदी वाढत असल्याचे बोलले जाते.