खालापूर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खालापूरातील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे – पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी (दि.29) सायंकाळी कॅंडल मार्च काढला होता; याशिवाय खोपोलीमध्ये उपोषण करण्यात आले. याठिकाणी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
खोपोलीतून (खालची) बाजारपेठूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मेणबत्ती प्रज्वलित करीत अभिवादन केल्यानंतर समारोपण करण्यात आले. “आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं’, “एक मराठा, लाख मराठा’ या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. तर कॅंडल मार्चमध्ये महिला, युवक, युवतींसह शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
खालची खोपोली अग्निशमन कार्यालयाच्या पटांगणातून कॅंडल मार्च सुरू झाला. यामध्ये उल्हासराव देशमुख, डॉ.सुनील पाटील, एकनाथ पिंगळे, ऍड. राजेंद्र येरूनकर, मंगेश दळवी, रमेश जाधव, मनेष यादव, अश्विनी पाटील, वैशाली जाधव, शिल्पा सुर्वे, अनिता पाटील, नितीन मोरे, संतोष देशमुख यांच्यासह महिला, युवक, युवती शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर कॅंडल मार्चचा समारोप करण्यात आला.
दरम्यान, याच मागणीकरिता खोपोलीत सोमवारी (दि.30) सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. खोपोलीतील भारतरत्नडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी विनोद साबळे, जे.पी.पाटील, उत्तम भोईर, संतोष जंगम, प्रभाकर देशमुख, किशोर पाटील, मंगेश दळवी, अविनाश तावडे, अमोल जाधव, विशाल गायकवाड, संकेत हाडप, अनंता हाडप, हरिश काळे, प्रसाद कर्णूक, इंदरमल खंडेलवाल, दिनेश गुरव ,जॉंन्टी तेलंगे, भूषण कडव, दिलीप पुरी, भाऊ सनस, संतोष देशमुख यांच्यासह खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.