12 बचत गटांना 32 लाखांचे कर्जवाटप
भवानीनगर – महिला बचतगटांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे, त्याच कारणासाठी कर्जाचा उपयोग करावा, असे मत ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघ माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शेतकरी निवास ट्रेनिंग हॉलमध्ये बारामती, इंदापूर येथील 12 बचत गटांना 32 लाख रुपयांचे कर्ज विविध व्यवसायासाठी वितरण करण्यात आले. यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या की, महिलांनी दिलेल्या कर्जाचा उपयोग ज्या कारणासाठी घेतले आहे त्याच कारणासाठी वापरावे. म्हणजे त्या कर्जातून उद्योग व्यवसाय उभारला जाईल. त्या व्यवसायामधून त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये भर पडेल व कुटुंबाला वाढीव उत्पादनाचा खूप मोठा आधार निर्माण होईल.
शारदा महिला संघ बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, या चार तालुक्यांत महिला बचत गट व महिला स्वावलंबी बनवण्याचे काम करीत आहे, हे करीत असताना महिलांना फक्त आर्थिक देवाणघेवाण याच विषयावर आम्ही काम करीत नसून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. प्राधान्याने महिलांचे आरोग्य, उद्योग व्यवसाय प्रशिक्षण, शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यावर आमचा जास्त मानस व भर आहे.
विविध जिल्ह्यातील अनेक महिला कृषी विज्ञान केंद्र व संस्थेला भेट देण्यासाठी येत असतात. त्यावेळी तेथील अभ्यास दौऱ्यातील अनेक महिला महिला संघाला जोडून घेणेबाबत विचारणा करीत असतात. त्यांची इच्छा असते; परंतु आपण सध्या काही तांत्रिक गोष्टीमुळे चार तालुक्यांमध्ये काम करून इथेच प्रभावीपणे महिलांना स्वावलंबी बनवण्याचा उद्दिष्ट साध्य केल्यानंतर बाहेरील भागामध्ये विचार करणार आहोत.
21 ते 25 डिसेंबर 2023 मध्ये आपली भीमथडी पुणे येथे शिवाजीनगर ऍग्री कॉलेज ग्राउंडवर चालू वर्षी भरणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यावर आलेली असून महिलांनी नाविन्यपूर्ण तयार केलेल्या उत्पादनाला आम्ही व नवनवीन बचत गटांना स्टॉल बाबत संधी देत आहोत.