पुणे – पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज संस्था व खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांमधील शिक्षक भरतीच्या जाहिराती दिल्यानंतर पात्र उमेदवारांना सर्व जाहिराती एकत्रित पाहण्याची सुविधा येत्या २९ जानेवारी २०२४ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज संस्था व खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १५ जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत २२ जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे. या कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया २४ जानेवारी पर्यंत पूर्ण करता येणार आहे.
राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णया मधील तरतुदींनुसार जाहिराती प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील, असे शिक्षण विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.