पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या 2 जानेवारीला राज्यभरातील केंद्रांवर होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना शासनाच्या निर्णयानुसार परीक्षेची संधी देण्यासाठी आयोगाने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे एमपीएससीद्वारे स्पष्ट केले आहे.
यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘रद्द परीक्षा, रद्दी सरकार…’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
दरम्यान, एमपीएससीने राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे आज दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भातील जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेल्याने त्यांची परीक्षा देण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना विशेष बाब म्हणून परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याबाबत 17 डिसेंबर रोजी राज्य शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत 2 जानेवारीला होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. शासनाच्या निर्णयानुसार 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी देण्यासाठी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षाच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क भरता येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.