मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची जी २० च्या निमित्ताने भेट झाली होती. त्याचा एक फोटो मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला होता. त्यांनी पोस्ट केलेल्या या फोटोवर उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. “ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला. काय बोलले त्यांना? कोणत्या भाषेत बोलले?” अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची उडवली होती. आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी याच टीकेवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
अतुल भातखळकर यांनी यासाठी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी,”आपले ४० आमदार शुद्ध मराठीत काय बोलत होते हे ज्यांना कळलं नाही ते आज ब्रिटनचे पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलले याची काळजी करताहेत. किती ही जळजळ… असे म्हणत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्यात २१ जून २०२२ रोजी सर्वात मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेच्या नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने हे घडलं.
उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ ला राजीनामा दिला आणि ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. पुढे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंना दिला. एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्यापासून त्यांचा उल्लेख गद्दार आणि मिंधे असाच ठाकरे गटाकडून केला जातो आहे.