नवी दिल्ली – राहुल गांधी यांची राजकीय उंची भारत जोडो यात्रेमुळे वाढली आहे. पक्षातील त्यांचे स्थान पूर्वीपासूनच बळकट होते ते आता अभेद्य झाल्याचे शिक्कामोर्तब एका सर्वेक्षणातून झाले आहे. मात्र त्याचवेळी राहुल यांच्यानंतर पक्षात क्रमांक दोनची पसंती कोणाला असा प्रश्न जर कोणाला पडला असेल किंवा कोणी विचारला तर साहजिकच सोनिया गांधी अथवा प्रियंका गांधी यांचे नाव घेतले जाऊ शकते. मात्र तशी स्थिती किमान आज तरी नाही. कारण दुसऱ्या क्रमांकाची पसंती राजस्थानातील युवा नेते सचिन पायलट यांच्या नावाला देण्यात आली आहे.
इिंडया टुडे- सी वोटर यांनी यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. त्यात कॉंग्रेसची सध्याची स्थिती कोण सुधारू शकतोल असा प्रश्न विचारण्यात आला होता. पक्षाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. मात्र त्यांच्या नावापेक्षा राहुल यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली आहे.
पक्ष सुधारण्येच्या बाबतीत केवळ 3 टक्के लोकांनी खर्गे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. कॉंग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून प्रियंका यांच्या ऐवजी सचिन पायलट यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तिसऱ्या आणि मग चौथ्या क्रमांकावर प्रियंका यांचे नाव आहे.
कॉंग्रेसमध्ये बदल कोण घडवून आणू शकेल असा प्रश्न लोकांना सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यावर राहुल गांधी यांच्या बाजूने 26 टक्के लोकांनी मत दिले. पायलट यांच्या बाजूने 16 टक्के तर मनमोहन सिंग यांच्या बाजूने 12 टक्के आणि चौथ्या क्रमांकावरच्या प्रियंका गांधी यांच्या बाजूने 8 टक्के लोकांनी मत दिले.