लोणी काळभोर -पुणे शहर, पिंपरी – चिंचवडसह जिल्ह्यातील बहुतांश गावांत करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन असणार आहे. याची धास्ती घेऊन रविवारी सकाळपासूनच हवेली तालुक्यातील बहुतांश गावातील किराणा मालाची दुकाने व भाजी मंडईमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची तुडूंब गर्दी केली होती.
लॉकडाऊन मधील पहिल्या 5 दिवसांत केवळ दूध विक्री व दवाखाना, मेडिकल यांनाच सवलत दिलेली आहे. तर पुढील 5 दिवसांत 18 जुलै नंतर यामध्ये काही अंशी शिथिलता येणार असे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पहिल्या 5 दिवसांत लागणारा किराणा माल व भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.आज सकाळी 10 वाजता लोणी काळभोर येथील भाजी मंडई सुरु होताच खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यामुळे हा रोजचा बाजार की आठवडे बाजार? हा प्रश्न उपस्थित होत होता. हिच परिस्थिती किराणा दुकानासमोर दिसत होती. दुकानदार मोठ्या खरेदीदारांच्या चिठ्ठ्या घेऊन त्यांना काही वेळात किराणा देत होते; परंतु ज्यांची खरेदी किरकोळ होती त्यांना मात्र ताटकळत उभे राहावे लागले. अचानक गर्दी वाढल्यामुळे दुुुकानदारांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली होती.