व्यावसायिक गॅसचे दर 214 रुपयांनी वाढले : चहा, नाष्टा, थाळीची दरवाढ अटळ?
पिंपरी – व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडर 214 रुपयांनी महाग झाल्याने बाहेरचे पदार्थ खाताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरवाढीमुळे मोठ्याहॉटेलचालकांबरोबरच लहान व्यावसायिक आणि टपरीचालकांनाही मोठी झळ बसणार आहे. त्यामुळे आता चहा, नाष्टा आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यावसायिक चिंतेत आहे.
मागील काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील महिन्यातच व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 150 रुपयांनी वाढ होऊन सिलिंडरची किंमत 1248 रुपयांवर गेली होती. आता पुन्हा 214 रुपयांनी दरवाढ झाल्याने तब्बल 1462 एका सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना मोठा दणका बसला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या हॉटेलबरोबरच लहान हॉटेल,चहाटपरी, स्नॅक्स सेंटर यांची संख्या मोठी आहे. या सर्व हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होतो. मात्र, त्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सिलिंडर वापरणे परवडत नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. या दरवाढीमुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे जेवण, नाष्टा महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छोट्या विक्रेत्यांना गॅस दरवाढीचा फटका
शहरात मोठ्या हॉटेलबरोबरच छोट्या हॉटेल व विक्रेत्यांची संख्याही मोठी आहे. गॅस सिलिंडर दरवाढीचा मोठ्या हॉटेलचालकांना तितकासा परिणाम जाणवणार नसला तरी छोट्या व्यावसायिकांवर मात्र मोठा परिणाम होणार आहे. सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीमुळे छोट्या व्यावसायिकांचे अर्थचक्र बिघडणार असून, त्यांना आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यामध्ये घट होणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढणार
घरगुती गॅसची सध्याची किंमत 705 रुपये आहे. त्यावर 140 रुपये अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होतात. मात्र, आता व्यावसायिक गॅसचे दर घरगुती गॅस सिलिंडरपेक्षा दुप्पट झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना परवडणारे नाही. परिणामी आता अनेक व्यावसायिक छुप्या पद्धतीने घरगुती गॅसचा वापर करण्याची शक्यता आहे.
मागील सहा महिन्यांत व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये 350 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल 1 फेब्रुवारी रोजी नव्याने जाहीर झालेल्या गॅसच्या दरामध्ये पुन्हा एकदा 214 रुपयांची वाढ झाली आहे. आम्हाला दोन दिवसाला एक सिलिंडरची आवश्यक्ता आहे. मात्र, आता दरवाढीमुळे प्रत्येक सिलिंडरमागे 400 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्याचा परिणाम नफ्यावर होत आहे.
– संकेत सूर्यवंशी, व्यावसायिक