पुणे – द्राक्षांचा हंगाम बहरला आहे. मार्केटयार्डातील ब्लॅक जम्बो, सोनाका, तासगणेश या द्राक्षांची आवक वाढली आहे. बाजारात दररोज सुमारे 20 ते 25 टन द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षाची चव गोड असून, ब्लॅक जम्बो द्राक्षांना जास्त मागणी असल्याचे आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यांतून सर्वात जास्त ब्लॅक जंबो द्राक्षांची आवक होते. तर नारायणगाव येथून ही काही प्रमाणात आवक होत आहे. सोनाका आणि तासगणेश या द्राक्षांची सांगली जिल्ह्यातील तासगाव, मनेराजुरी, कौलापुर, सोनी या भागांतून आवक होत आहे. सध्या बाजारात दररोज ब्लॅक जंबो द्राक्षांची 8 ते 10 टन इतकी आवक होत आहे. तर सोनाका आणि तासगणेश द्राक्षांची 12-15 टन आवक होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुणे शहर, उपनगरसह, महाबळेश्वर, वाई, पाचगणी, लोणावळा, रायगड, रत्नागिरी या भागातून द्राक्षांना मोठी मागणी आहे.
यावर्षी अतिवृष्टीटीमुळे द्राक्षांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची आवक कमी होत असल्याचे काची यांनी संगितले.