मुंबई – मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळे राहते घर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये चौघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेंबुरच्या जुन्या बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका दुमजली घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला आहे.
या ठिकाणी राहणाऱ्या अंभोरे कुटुंबियांच्या घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटानंतर घराच्या भिंती कोसळल्या.
परिणामी सात ते आठजण घरात अडकले होते. स्थानिकांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
त्यांनी तत्काळ घरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. आतापर्यंत या घटनेतील ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर जखमींमध्ये एका महिलेसह चौघांचा समावेश आहे.