आत्महत्येपूर्वी विवाहितेने लिहिली चिठ्ठी
पिंपरी – पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत “आपल्यावर विधवा म्हणून अंत्यसंस्कार करा,’ असा मजकूर लिहिला होता. ही घटना आकुर्डी येथे घडली.
रुपाली कांबळे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. जयंत कांबळे (वय 42, दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी कांबळे याची मृत पत्नी रुपाली यांनी 20 डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेहाचा पंचनामा करत असताना पोलिसांना कपड्यांमध्ये चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने आपण पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.