तिरुवनंतपूरम – बी. एससीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २१ व्या वर्षी आर्या राजेंद्रन यांची निवड तिरुवनंतपूरमच्या महापौरपदावर झाली. अलाहाबादच्या महापौरपदी विराजमान झाल्याने सर्वात तरूण महापौर होण्याचा अभिलाषा गुप्ता यांचा विक्रम २३ वर्षांनी मोडला.
मी खूप लहान वयात राजकारणात आले. पक्ष देईल ती जबाबादारी मी आनंदाने स्वीकारेन, अशी प्रतिक्रिया आर्या यांनी दिली. विद्युतकर्मी के राजेंद्र आणि एलआयसी एजंट असणाऱ्या श्रीलता राजेंद्र यांची कन्या असणाऱ्या आर्या या मध्यमवर्गीय आहेत. मोटोरेबल रस्त्यावर त्यांचे बैठे घर आहे.
अलिकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाने लक्षणीय यश मिळवले आहे. त्यात तिरूवनंतपुरम सारख्या महत्वाच्या महापालिकेची धुरा पहिल्यांदाच निवडून आलेल्या युवतीकडे सोपवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते जमील श्रीधरन आणि अन्य दोन नेते महापौर पदाच्या शर्यतीत होते. मात्र पक्षाने तरूण नेतृत्वावर विश्वास दाखवला.
पालिकेतही त्या सर्वात लहान आहेत. मात्र, आर्या यांना राजकारण नवे नाही. त्या पक्षाच्या लहान मुलांसाठी असणाऱ्या बाल संगम या संघटनेत सहाव्या वर्षी दाखल झाल्या. सध्या त्याच्या त्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रदेश कार्यकारिणीत आहेत.
वारसा असणारे थिरूवनंतपुरम हे आधीच सुंदर शहर आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून मी ते आणखी स्वच्छ ठेवेन. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेईन. मुख्यमंत्री पिनाई विजयन आणि आरोग्य मंत्री के. के. शैलजा माझे प्रेरणास्थान आहेत, अशी प्रतिक्रिया आर्या यांनी दिली.