पुणे – दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणार्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक लाख साठ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमधील एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रिझवान अजमत अली (३२, रा. लिबासपुर, दिल्ली), ईकरार नसीर अहमद (२७, रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी हे कोंढव्यातील क्रांती चौक परिसरात राहण्यास आहेत. १३ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरातून आरोपींनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. याबाबत कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास करीत असताना गोकुळनगर भागात दोघेजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तसेच, ते वॉचमन नसलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन पाहणी करत असल्याचे समजले.
त्यानूसार पोलिसांच्या पथकाने रिझवान आणि ईकरार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. आरोपींनी चोरीचा मुद्देमाल दिल्ली येथे ठेवल होता. पोलिसांनी दिल्ली येथून सोन्याचे दागिन्यांसह एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्यांमधील आरोपी रिझवान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, ज्योतीबा पवार, ज्ञानेश्वर भोसले, अनिल बनकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.