नवी दिल्ली : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे पण अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, आज राजधानी दिल्लीत काहीसा तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडूनमध्ये 12 ते 14 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसामुळे रस्त्यांची आणि पुलांचीही मोठी दुरावस्था झाली आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये 15 ऑगस्टनंतरच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यप्रदेशात येत्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र, या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या रिमझिम सरी पडू शकतात. 15 ऑगस्टनंतरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 15 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी पाऊस पडू शकतो. तर, पश्चिम उत्तर प्रदेशात रविवारी आणि 14 ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानविभागाने म्हटले आहे की, पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार आणि जम्मूमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील सात दिवसांत उर्वरित वायव्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व भारतात रविवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या भागांत पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी पश्चिम बंगालमध्ये आणि झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.
बिहारमधील 9 जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. झारखंडमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही. याशिवाय गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.