बुलढाणा – वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या हव्यासापोटी गर्भातच कळी खुडण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये घडले आहेत. अद्यापही अनेकदा अशा घटना घडल्याचे निदर्शनास येते. असे असताना मात्र वंशाची पणती असलेल्या स्त्री जन्माचे स्वागत बापाने 3 क्विंटल जिलेबी वाटून करण्यात आले आहे. या पित्याचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वच क्षेत्रांत मुलींनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे भेदभाव न करता जन्माला आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करावे, यासाठी हा सोहळा साजरा केला असल्याची भावना मुलीच्या पित्याने व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर महिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील अमडापुर येथील डाॅ. विशाल देशमुख यांना गेल्या महिन्यात मुलगी झाली. देशमुख यांच्या घरातील ही पहिलीच मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे. विशाल देशमुख यांची सासरवाडी सातारा जिल्ह्यातील आहे. ते आपल्या लाडक्या लेकीला सातारा जिल्ह्यातील वाई या गावी आपल्या परिवारासह गेले होते.
दरम्यान, विशाल यांनी आपला आनंद तब्बल 3 क्विंटल म्हणजे 300 किलो जिलेबी वाटून साजरा केला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं आगमन अतिशय थाटात केलं. त्यांच्या या आनंदाची चर्चा साऱ्या पंचक्रोशीत पसरली आहे. मुलगी जन्माला आल्याने त्यांनी संपूर्ण गावाचं तोंड गोड कलं आहे. मुलीच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. यावेळी गावातील बाजा लावून वाजत गाजत मुलीचं स्वागत करण्यात आलं.