बुलढाणा – बुलढाणा जिल्हा हा पारंपारिकरित्या काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ राहिलेला आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला, तर कधी दुसऱ्या पक्षाला सुटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण जात आहे.
त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा आणि काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्वच्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत आपले लक्ष वेधले आहे.
बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेली असल्याचे बोलले जात आहे. तर या जागेवर प्रा. नरेंद्र खेडेकर हे संभावित उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब न झाल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
अशातच आता हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त करत बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज आपले राजीनामे देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.