नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून डिजीटल इकॉनॉमिचा जोरदार प्रचार केला जात असला तरी देशातील बाजारात चलनी नोटांचे प्रमाण वाढतच असल्याचे सरकारनेच आज लोकसभेत दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
मार्च 2022 मध्ये देशातील बाजारात असलेल्या चलनी नोटांचे प्रमाण 31.33 लाख कोटी रुपयांवर गेले आहे, जे 2014 मध्ये 13 लाख कोटी रुपये होते, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. सन 2014 च्या तुलनेत देशातील बाजारात असलेल्या चलनी नोटांचे प्रमाण जीडीपीच्या तुलनेत 13.7 टक्के इतके झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नोटबंदीच्यावेळी देशात चलनात असलेली रोकड 16 लाख 63 हजार कोटी रुपये इतकी होती. ही रक्कम मार्च 2018 मध्ये 18.29 लाख कोटी रुपयांवरून मार्च 2019 आणि मार्च 2020 मध्ये अनुक्रमे 21.36 लाख कोटी रुपये आणि 24.47 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. यावरून बाजारातील चलनी नोटांचे प्रमाण आणि रोखीचे व्यवहार वाढतच असल्याचे दिसत आहे.