Food Poisoning In Buldhana : बुलढाण्यात एका कार्यक्रमात उपवासाची भगर आणि आमटी खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान उपवासाची भगर आणि आमटी जेवल्यानंतर 500 हून अधिक जणांंना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या सर्व रुग्णांवर सिंदखेड बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर काही जणांवर उपचार सुरू आहेत. यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे. सुदैवाने आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
रुग्णालयात डॉक्टर गैरहजर
बुलढाण्यात साधारण 500 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली होती. परिसरात असलेल्या सर्वच आरोग्य केंद्रात या रुग्णांना दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णालयातील जागा आणि डॉक्टर अपूर्ण पडत असल्याने बुलढाणा येथून डॉक्टरांचे पथक बोलवण्यात आले. अनेक रुग्णांंना जागे अभावी जमीनीवर उपचार घ्यावे लागले. तसेच अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात काही डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय झाली होती. यामुळे नगरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता.