मुंबई :- युद्ध व शस्त्रास्त्रे ही देशाची सच्ची शक्ती नसून संस्कृती हीच भारताची सौम्य संपदा आहे. संस्कृतीला आधारभूत मानून सर्जनशीलतेला चालना दिल्यास आपण अजरामर कृती तयार करू शकू असे सांगताना सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
‘भारतीय सिनेमा व सौम्य संपदा’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व फ्लेम युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या चर्चासत्राला ज्येष्ठ चित्रपट निर्माते तसेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शेखर कपूर, माजी खासदार रूपा गांगुली, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. दिशान कामदार, प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी व संयोजक विनोद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय सिनेमाच्या सौम्य संपदेमुळेच अनेक देशातील लोकांना भारतीय भाषा समजत असल्याचे सांगताना भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानामुळेच रामायण व महाभारत यांवर आधारित धारावाहिक सर्वाधिक चालल्या, असे राज्यपालांनी सांगितले.
स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण तसेच आज जगभर मान्यता पावलेला भारतीय योग देशाच्या सांस्कतिक संपदेचे द्योतक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून ते चित्रपटांच्या माध्यमातून जगापुढे यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.