ICC Test Rankings : बुमराहचा आणखी एक मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज…

ICC Test Ranking, Jasprit Bumrah Record : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेट क्रमवारीत नवा नंबर वन गोलंदाज बनला आहे. अवघे 34 सामने खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठले आहे आणि यासोबतच त्याने असा विक्रमही प्रस्थापित केला आहे जो यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाच्या नावावर नव्हता. जसप्रीत बुमराहने बुधवारी जाहीर केलेल्या नवीन आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. यासह जसप्रीत बुमराह हा एकदिवसीय, टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कारही जिंकला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 15 विकेट घेतल्या असून तो या यादीत अव्वल स्थानावर आहे. या कामगिरीचा त्याला आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत फायदा झाला आहे. 3 स्थानांची झेप घेत तो 881 गुणांसह थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (851 गुण) दुसऱ्या स्थानावर कायम आहे तर भारताचा आर अश्विन (841 गुण) दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स चौथ्या तर जोश हेजलवूड पाचव्या स्थानावर आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा 746 गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत 9व्या स्थानावर घसरला आहे.
बुमराहने रचला इतिहास…
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज आहे ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या 5व्या क्रमांकावर असलेल्या या गोलंदाजाने 2018 मध्ये अव्वल स्थान गाठले होते. बराच काळ टी-20 पासून दूर असलेल्या या गोलंदाजाने 2017 मध्येही या फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते.
कसोटीपूर्वी बुमराह एकदिवसीय आणि टी-20 मध्येही नंबर वन गोलंदाज होता. अशा परिस्थितीत त्याने कसोटीत प्रथम क्रमांक मिळवून इतिहास रचला. तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा बुमराह जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणताही गोलंदाज अशी कामगिरी करू शकला नाही. आतापर्यंत फक्त दोन आशियाई क्रिकेटपटू तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनू शकले आहेत आणि हे दोन्ही खेळाडू भारताचे आहेत.
ICC Test Rankings : युवा फलंदाज ‘यशस्वी जैस्वाल’ने क्रमवारीत घेतली मोठी झेप….
विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला होता. आता जसप्रीत बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावणारा दुसरा आशियाई क्रिकेटर बनला आहे. याशिवाय बुमराह हा कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आहे.
विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून आहे दूर…
विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. तिसऱ्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन करण्याची शक्यता होती. मात्र विराट कोहली तिसरी कसोटी खेळणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तथापि, असे असूनही, विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे जो आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल 10 मध्ये कायम आहे. विराट कोहली सध्या 7व्या क्रमांकावर आहे.
बुमराहने केले दमदार पुनरागमन
जसप्रीत बुमराहचे पुनरागमन हे कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी पुनरागमन म्हणूनही पाहिले जाऊ शकते. 2022 मध्ये, जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास एक वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. गेल्या वर्षी बुमराह मर्यादित षटकांत क्रिकेटच्या मैदानात परतला. या वर्षाच्या सुरुवातीला केवळ 4 कसोटी खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. बुमराहचे हे यश देखील विशेष आहे कारण त्याने फिरकीपटूंसाठी उपयुक्त खेळपट्टीवर 9 विकेट्स घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली आणि इतिहास रचला.





