किव्ह/मॉस्को – युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन फौजा घुसल्याचे वृत्त आहे. सध्या युक्रेनच्या उत्तरेकडील जिल्हा ओबोलॉनमध्ये या फौजा केंद्रीत झाल्या आहेत. राजधानी किव्हमध्ये संसदेच्या परिसरातील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागावर रशियाने क्षेपणास्त्रांनी मारा केला. दरम्यान, युक्रेनमधील चर्नेबील अणूभट्टीवर रशियन फौजांनी ताबा मिळवला आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या भागात रशियन फौजा घुसल्याचे ट्विट युक्रेनने केले. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केले. दरम्यान ओबोलॉनच्या रिकाम्या रस्त्यांवर रशियाची चिलखती वाहने फिरत असल्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांत फिरत आहेत. त्याची खातरजमा बीबीसीने केली आहे.
अनेक ठिकाणी नागरिक आणि लष्करी गणवेशातील व्यक्तींमध्ये झटापट होताना दिसत आहे. किव्हमध्ये हवाई हल्ले करण्यात आले असून नागरिकांनी भूयारी रेल्वेस्थानकांत आश्रय घेतला आहे.
रशिया-ब्रिटन संबंध ताणले
युक्रेनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडने त्यांच्या हवाई हद्दीचा भंग करण्यास रशियाच्या लढाऊ विमनांना बंदी केली. त्यानंतर रशियाने इंग्लंडशी संबंधित कोणत्याही विमनांना रशियन हवाई हद्दीचा भंग करण्यास मनाई करण्यात आली.
चर्नेबिल अणूभट्टी रशियाकडे
रशियन फौजांनी चर्नेबील अणूभट्टी ताब्यात घेतली असून तेथे किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र आम्ही केवळ त्याचे संरक्षण करत असल्याचे रशियाने म्हटले आहे. राष्ट्रवादी गट किंवा अन्य दहशतवादी संघटनांकडील त्याचा वापर होऊन आण्विक प्रक्षोभक कृत्ये घडवली जाऊ नयेत म्हणून तेथे लष्करी सावधानता बाळगल्याचे सांगण्यात आले. तसेच किरणोत्सर्गाची पातळी मर्यादित असून त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही रशियाने म्हटले आहे.
रशियाचे दावे
आपल्या फौजा डोन्स्टेककडे कुच करत असल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनच्या दीडशे जवनांनी शरणागती स्वीकारली असून युक्रेनच्या काही डझन लष्करी अस्थापना, शस्त्रे आणि वाहने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
युक्रेनने दावा फेटाळला
डोन्स्टेक आणि लुहान्सक या दरम्यानच्या रेषेवर रशियन फौजांना युक्रेनने रोखून धरले आहे. त्या भागातच रशियन फौजांना रोखून धरले आहे. रशियाला कोणतेही यश मिळाले नाही. रशियन सैन्याला अनेक भागात मागे सारल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या दोन्ही बाजूच्या दाव्यांची शहानिशा होऊ शकली नाही. आपले वय विसरून सैन्यात सामील व्हावे. केवळ अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश नसावा, असे आवाहन लष्कर प्रमुख युरी गालुश्किन यांनी केले आहे.
पुतीन थांबणार नाहीत
आम्हाला हे युध्द युरोपीय राष्ट्रांचे युध्द बनवायचे नाही. त्यामुळे आम्ही या युध्दात प्रत्यक्ष उतरणार नाही. मात्र युक्रेनला सर्व प्रकारच्या साहित्याची मदत देऊ. मात्र रशिया युक्रेन गिळंकृत करून थांबणार नाही. बाल्टील प्रांतातील राष्ट्रांना पुतीन स्वतंत्र राष्ट्र मानत नाहीत. त्यामूळे आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू, असे इंग्लंडचे संरक्षण मंत्री बेन वॅलेस यांनी म्हटले आहे.