Russia-Ukraine War| रशियाने युक्रेनमधील अवदिवका शहराचा ताबा घेतला आहे. युक्रेनच्या सैन्याने या शहरामधून माघार घेतल्यानंतर रशियाच्या सैन्याने या शहराचा ताबा घेतला आहे. या विजयाबद्दल रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी आपल्या सैन्याचे कौतुक केले आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गीय शोयगू यांनी पुतीन यांना या विजयाची माहिती दिली आहे.
युक्रेनच्या सशस्त्र दलांसाठी अवदिका हे एक शक्तिशाली बचावात्मक केंद्र होते आणि ते ताब्यात घेतल्याने युद्ध सुरू असलेला भाग डोनेस्तकपासून दूर जाईल. यामुळे रशियाच्या सैन्य दलावर मारा करण्याची युक्रेनची क्षमता कमी होईल, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या महत्वाच्या विजयाबद्दल अध्यक्ष पुतीन यांनी सैनिकांचे अभिनंदन केले आहे, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेश्कोव यांनी म्हटले आहे.
अवदिवका येथे गेल्या काही महिन्यांपासून जोरदार धुमश्चक्री सुरू होती. रशियाच्या सैन्याला पूर्वेकडील आघाडीवरून दूर हटवण्याच्या प्रयत्नात युक्रेनला फारच थोडे यश मिळाले होते. मात्र आता युक्रेनच्या सैन्याने तेथून माघार घेतली आहे.
सैन्याला घेरले जाणे आणि संभाव्यजीवितहानीचा धोका टाळण्यासाठी सैन्याला माघारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे युक्रेनच्या नवीन लष्कर प्रमुखांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
रशियाने ताबा घेतलेल्या डोनेत्सक शहराच्या उत्तरेला १० किलोमीटर अंतरावरील या शहरामध्ये गेल्या दोन वर्षात मोठा रक्तपात झाला आहे. ही जीवितहानी बाखमत येथे झालेल्या प्रचंड जीवितहानीशी केली जाते आहे.
दरम्यान मोठी जीवितहानी वाचवण्यासाठी केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.
तथापि, रशिया ऑक्टोबरपासून हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने तीन बाजूंनी वेढा घातला होता. युक्रेनियन सैन्याने माघार घेण्यापूर्वी रसद पुरवण्याचे बहुतेक मार्ग बंद करण्यात आले होते. अवदिका शहरामध्ये सुमारे ३४ हजार नागरिकांचे वास्तव्य होते. मात्र युद्ध सुरू झाल्यापासून बहुतेकांनी तेथून पळ काढला असून आता केवळ एक हजार जण तेथे शिल्लक राहिले आहेत.
अनेक युक्रेनियन सैनिकांना रशियन सैन्याने पकडले आहे, असे अवदिका मधून बाहेर काढण्याचे आदेश जारी करण्यापूर्वी, परिसरातील युक्रेनच्या सैन्याचे कमांडर ऑलेक्झांडर टारनाव्स्की यांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान रशियाकडून युक्रेनच्या आणखीन काही शहरांचा ताबा घेतला जाऊ शकतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.