पिंपरी – करोनाच्या नियमांचे उल्लंघन करणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पाच कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर न पाळणे, कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर फिरणे, बार आणि रेस्टॉरंटकडून मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आदी कारणांसाठी ही दंड वसुली करण्यात आली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विविध नियम लागू करण्यात आले. नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडूनही दंड आकारण्यास सुरूवात झाली. महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या 22 सप्टेंबरपर्यंतच्या माहितीनुसार, मास्क न वापरल्याबद्दल 88 हजार 768 नागरिकांकडून तब्बल 4 कोटी 43 लाख 82 हजार 516 रुपयांचा दंड वसूल केला.
सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 1 हजार 160 नागरिकांकडून तब्बल 26 लाख 23 हजार 502 रुपये इतका दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 6 हजार 33 नागरिकांकडून 15 लाख 88 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर फिरणाऱ्या 168 नागरिकांकडून 1 लाख 26 हजार 500 रुपये इतका दंड वसूल केला.
रेस्टॉरंट चालकांकडून 42 लाखांचा दंड वसूल
रेस्टॉरंट आणि बार चालकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या होत्या. या सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 435 व्यावसायिकांकडून 41 लाख 99 हजार रुपये इतका दंड वसूल केला. पहिले, दुसरे व तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून ही दंड वसूली करण्यात आली.