मंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. तर दुसरीकडे गौतमीच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे.
12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमीने अवांतर पैसे घेतले. तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केली, असं तक्रारदार राजेंद्र गायकवाड याने आपल्या तक्रारीत म्हंटलय.
भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गौतमीच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. गौतमी पाटीलच्या लावणीने अल्पावधीतच अनेकांना वेड लावले आहे.
सध्या तिच्या लावणीची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. लोक लांबून लांबून गौतमीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, गौतमी पाटील ही पहिल्यांदा तीच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली.
‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाही’ या गाण्यावर नृत्य करत असताना तीने अश्लील हावभाव केले होते. त्यावरून तीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तीला विदर्भरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी तीचा एक वस्त्र बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तीच्याबाबत अनेकांनी सहानुभूती दाखवली होती.
गौतमी पाटील आता मोठी सेलिब्रिटी झाली असून तीच्या कार्यक्रमाला पोलीसांचाही बंदोबस्त असतो. तसेच तीचे वैयक्तिक अंगरक्षक देखील तीच्या संरक्षणासाठी तैनात असतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला की चर्चा होणार आणि प्रसिद्धी मिळणार या हेतून अनेकजणांचा तीचा कार्यक्रम ठेवण्याकडे कल दिसून येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी चक्क बैलाच्या वाढदिवसालाही गौतमीचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता.