कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप मुश्रिफांवर केले होते. त्यानंतर आजपर्यंत सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. अश्यातच, आज किरीट सोमय्या कोल्हापुरात गेले असताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी किरीट सोमय्या यांनी एक मोठा दावा देखील केला.
यावेळी सोमय्या म्हणाले, “कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेत भेट घेणार आहे. अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येतात, पण मी सांगितलं मीच भेटायला कोल्हापूरला येतो. गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या आपल्या जीवाची पर्वा करणार नाही. न्यायालयात काय होतंय पाहुया…’ असं सोमय्या यावेळी म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘हसन मुश्रीफ कुटुबीयांचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता, पण तो 500 कोटीहून अधिक होता. मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेलाही सोडलं नाही.’ असं देखील सोमय्यांनी म्हटले आहे. दरम्यान, 11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.