सोशल डिस्टन्सिंगला ‘ब्रेक’

वाहतूक कोंडीत नियमांचा विसर : शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली

– कल्याणी फडके

पुणे – शहरातील व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे दररोज हजारो पुणेकर बाहेर पडत आहेत. पर्यायाने रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत आहेत. दुसरीकडे सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत असल्याने, सोशल डिस्टन्सिंगला “ब्रेक’ लागत असल्याचे दिसत आहे.

लॉकडाऊनमध्ये शहरातील व्यवहार ठप्प होते. या कालावधीत केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे नेहमी गजबजणारे रस्ते तब्बल दोन महिने “सायलेंट’ होते. मात्र, आता शहर टप्प्याटप्प्यात “अनलॉक’ होत आहे.

त्यामुळे मोठ्या संख्येने व्यावसायिक, नोकरदार, कामगार बाहेर पडत आहेत. याशिवाय विविध शासकीय कामे, वैयक्‍तिक कामे, खरेदी आदीच्या निमित्ताने अडीच महिने घरामध्ये बसलेले नागरिक घराबाहेर पडत आहेत. पर्यायाने संबंधित व्यक्‍तींकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

मास्क नसणाऱ्यांची सिग्नलवर “रिस्क’
नागरिकांनी वाहन चालवताना देखील मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही अनेक जण मास्क शिवाय रस्त्यावर दिसतात. मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारण्याची शिक्षा असली तरी मोकळ्या चेहऱ्याने फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रस्त्यात थुंकू नये, असे वारंवार आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असताना काही जण मास्क “ऍडजस्ट’ करून रस्त्यावर थुंकत असल्याचे चित्र आहे. याशिवाय मास्क नसणारा वाहनचालक सिग्नलवर अधिक “रिस्की’ ठरतो आहे. सिग्नलवर शारिरीक अंतर ठेवणे शक्‍य नसले तरी वाहनांत डिस्टन्स ठेवून थांबणे गरजेचे आहे.

पीएमपी बंदमुळे वाहतुकीवर ताण
शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसची सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. त्यातही रिक्षा बंद की सुरू, यातही संभ्रम आहे. शिवाय अशा वाहनांतून प्रवास धोक्‍याचा वाटत असल्याने अनेक जण खासगी वाहनांनीच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे पीएमपी सारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. विविध कार्यालये, दुकाने आदी ठिकाणचे कामगार, लहान व्यावसायिक घरापासून कामाचे ठिकाण गाठण्यासाठी पीएमपीचा वापर करतात. अनेकांकडे खासगी वाहने नाहीत. अशांना पीएमपी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्‍न भेडसावत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.