जळोची – ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी कसा असावा, तर बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासारखा’, असे सध्या बारामती आणि परिसरात बोलले जात आहे. जयंत मीना यांनी बारामती उपविभागाची सुत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बारामती शहर, तालुका, वडगाव निंबाळकर, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, रांजणगाव, शिक्रापूर, सासवड, जेजुरी, भोर, राजगड या 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोपनीय माहिती मिळवून अवैध व्यवसायांवर कारवाईचे शतक पार केले आहे.
जयंत मीना यांच्या कामाची पद्धत “कुछ और ही है..’ विचारविनिमय व बैठकांपेक्षा आपल्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या अवैध व्यवसांयाची गोपनीय माहिती मिळवण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसते. ठिकठिकाणी कारवाया करत कारवायांचे शतक पार करुन 114 अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांनी 7 कोटी 05 लाख 45 हजार 906 रुपयांचा माल जप्त केला आहे.
9 मार्च 2019 रोजी जयंत मीना यांनी बारामती उपविभागाचा पदभार हाती घेतल्यापासून अवघ्या आठ महिन्यात त्यांनी आपल्या कारवाईचे शतक पूर्ण केले. या कारवायांचा लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात मोठा परिणाम दिसून आला. ठिकठिकाणच्या कारवाईत आवश्यकतेनुसार केलेल्या कारवाईत मीना यांनी बारामती क्राईम ब्रॅंच पथकाचे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक भाऊसो मोरे, रॉकी देवकाते आणि जलद कृती दलाचे जवानांना सोबत घेऊन अवैध धंद्यावर कारवाई केली.
या कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले असून त्यांनी बक्षिस जाहिर केले.