प्रशासनाकडून किरकोळ समस्या देखील सोडवल्या जात नसल्याची उपस्थितांनी व्यक्त केली खंत
पिंपळनेरला दारूबंदी करावी
तालुक्यातील संत निळोबाराय मंदिर असलेल्या पिंपळनेर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असून, पोलीस खात्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार या जनता दरबारात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आ. नीलेश लंके यांनी सपोनि विजयकुमार बोत्रे यांना केली.
पारनेर – पारनेर येथे आमदार नीलेश लंके यांनी पहिल्यांदाच जनता दरबार भरविला. यावेळी उपस्थितांनी समस्यांचा चांगलाच भडिमार केला. प्रशासनाकडून किरकोळ तक्रारींचीही दखल घेतली जात नसल्याचा संताप उपस्थितांनी व्यक्त केला. त्यावर आ. लंके यांनी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
जनतेची कामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी आ. लंके यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनतादरबार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार सोमवारी (दि.2) या जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी 243 तक्रार अर्ज दाखल झाले होते. त्यात महावितरण संबंधिची 43 प्रकरणे होती. महसूल विभागाच्या अंतर्गत प्रलंबित सात-बारा नोंद व दुरुस्ती शिधापत्रिका, फेरफार दुरूस्तीसह रस्ते व जमीन वाटपासंदर्भातील तक्रारींचा मोठा भरणा होता.
यावेळी महसूल विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा या जनता दरबारात करण्याचा प्रयत्न तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला. दुसरीकडे आ. लंके यांच्या पहिल्याच जनता दरबारात सर्वच विभागांच्या शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या काळात तहसील कार्यालयाचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे हे सुशोभीकरण कोणत्या शासकीय निधीतून केले, याची माहिती अधिकारात व तक्रार अर्ज बबनराव कवाद यांनी दाखल केला होता.
त्यावेळी तहसीलदार देवरे यांनी एक रुपयाही शासकीय निधी खर्च करून हे सुशोभीकरण केले नसल्याचे सांगितले. दुसरीकडे वाळू कारवाईत पंचनामा चुकीचा केला असल्याचा आरोप कवाद यांनी केला. आ. लंके यांनी जनतेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, नायब तहसीलदार रमेश काथोटे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहायक निबंधक एस. डी. सूर्यवंशी,
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुमावत, महावितरणचे प्रशांत आडभाई, सपोनि विजयकुमार बोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सभापती सुदाम पवार, विक्रम कळमकर, बबलू रोहकले, नगरपंचायतीचे सभापती नंदकुमार औटी, उद्योजक विजय औटी, पं. स. सदस्य दिनेश बाबर, संतोष काटे, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, बापू शिर्के, सरपंच ऍड. राहुल झावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, जयसिंग मापारी, कारभारी पोटघन, सचिन पठारे, संदेश कापसे, ग. वा. रोहकले, श्रीकांत चौरे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.