बीपीओ बलात्कार प्रकरण : फाशीला विलंब झाल्याने जन्मठेप द्या – आरोपींची विनंती याचिका

आरोपींच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल

14 जूनला होणार सुनावणी

मुंबई (प्रतिनिधी) – पुण्यातील गहुंजे येथे एका बीपीओ कर्मचाऱ्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावनी करण्यास विलंब झाल्याने ती रद्द करा आणि जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी विनंती करणाऱ्या दोघा आरोपींच्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. या याचिकेवर 14 जून रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे या दोघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने येत्या 24ला फाशी देण्यासंबंधीचे वॉरंट जारी केले आहे.

मुळची गोरखपूर गावची पिडीत महिला पुण्यातील गहुंजे इथं एका बीपीओ कंपनीत काम करीत होती. कामावर कंपनीच्या गाडीने गेली. मात्र दुसऱ्या दिवशी घरी न आल्याने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान, 2 नोव्हेंबर 2007 रोजी तिचा मृतदेह गहुंजे येथे आढळला. याप्रकरणी पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे यांना अटक करण्यात आली.

पुणे सत्र न्यायालयाने मार्च 2012 मध्ये दोघाही आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. त्यावर उच्च न्यायालयाने 5 मे 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्यपालांनी 2016 मध्ये, तर राष्ट्रपतींनी 2017मध्ये त्यांच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला.

त्यानंतर दोन वर्षांनी 24 जून 2019 रोजी फाशी देण्यासंबधी वॉरंट जारी करण्यात आल्याने या दोघा आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेऊन फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य तसेच केंद्र सरकारने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने याचिकेची सुनावणी 14 जून रोजी निश्‍चित केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.