नवी दिल्ली : चेन्नईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्याने एका मुलाने आपले जीवन संपवले असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मृत मुलाच्या वडिलांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. चेन्नई पोलिसांनी याविषयी माहिती दिली.
चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत नापास झाला. जगदिश्वरनने 2022 मध्ये 427 गुणांसह बारावी पास झाला. मात्र, जगदीश्वरनला दोन प्रयत्नांत नीट परीक्षेत नापास झाला. शनिवारी त्याने वडिलांच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरात त्याचा मृतदेह आढळला. मुलाच्या आत्महत्येमुळे वडील सेल्वसेकर याना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जगदिश्वरनचे वडील सेल्वसेकर मृतावस्थेत आढळले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांनी आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, स्वत:वर विश्वास ठेवा आणि आयुष्य जगा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दावा केला की, काही महिन्यांत NEET परीक्षा रद्द करण्यात येईल.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी, ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण पाहता, सरकार नीट परीक्षा वगळ्याच्या प्रयत्नात आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. अशा परिस्थितीत आत्महत्येचा विचार मनात आणू नका. विद्यार्थ्याच्या मार्गातील अडथळा ठरणारी नीट परीक्षा लवकरच वगळण्यात येईल. तामिळनाडू सरकार यासाठी प्रयत्नशील आहे.’ असे देखील यावेळी म्हटले.