खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या

रेडीमेड “मिनी’ गुढ्यांना विशेष पसंती

छोटी काठी.. छोटा तांब्या.. नक्षीदार साडी.. आणि त्यावरील नाजूक सजावट अशी भूरळ पाडणारी गुढी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवसेंदिवस वाढत्या प्लॅट संस्कृतीमुळे मोकळी जागा कमी होत चालली आहे. पर्यायाने पूर्वीसारख्या उंच गुढ्या उभारणे शक्‍य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी “मिनी’ गुढ्यांना पसंती दर्शविली आहे. छोट्या जागेत ठेवता येणारी गुढी सध्या “ट्रेन्ड’मध्ये आहे. देवघरासमोर, टेबलवर, कारमध्ये ही सहज ठेवता येणाऱ्या गुढ्यांना बाजारामध्ये विशेष मागणी आहे. साधारण वीस रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत गुढ्या ऑनलाइन आणि बाजारात देखील “भाव’ खात आहेत.

सातारा – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्‍ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा अगदीच तोंडावर येऊन ठेपला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा समजला जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी गुढी उभारली जात असल्याने साखरेच्या गाठी, आंब्याची पाने, लिंबाचा पाला, गुढीसाठी बांबू, वस्त्र आणि अन्य साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.

गुढीपाडव्यानंतरच हिंदू सणांना सुरुवात होते. चैत्रपालवीचा हा सोहळा गुढी उभारून साजरा केला जातो. त्यासाठी अनेकांची आधीपासूनच तयारी सुरू होते. अगदी घर आवरण्यापासून, जाळीजळमटे काढण्यापासून ते गुढीसाठी लागणारे साहित्य तयार ठेवण्यापर्यंत महिलावर्गाची लगबग सुरू असते. नव्या वर्षाचे स्वागत हे याच पद्धतीने करायचे हा नियम परंपरागत आहे. त्यामुळे तो घरोघरी पाळला जातो.

पूर्वीच्या काळी उंचच उंच गुढी उभारली जात असे. त्यातही कोणाची गुढी उंच याची “कॉम्पिटिशन’ असे. परंतु, अन्य सणांसारखाच यामध्येही आधुनिकतेने शिरकाव केला आहे. वाडा संस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आल्याने गुढ्यांचा साईजही छोटा झाला आहे. त्यामुळे अन्य कोणाला त्रास न होता खिडक्‍यांमधून गुढ्या बाहेर डोकावताना दिसतात. त्यामुळे छोट्या आकाराचे बांबू विक्रीसाठी आले आहेत. घरातील स्त्री त्यांची एखादी नवी कोरी साडी या गुढीला नेसवत असे. परंतु, आता खणाचेच काठ लावलेले छोटे तयार वस्त्र बाजारपेठांमध्ये दिसू लागले आहे. त्यामुळे इन्स्टन्टचा जमाना आता गुढ्यांमध्येही दिसू लागल्याने नवल वाटण्याचे काही कारण नाही. मात्र, “डाएट’च्या जमान्यात गाठीची परंपरा अद्यापही अनेकांनी जपली आहे. त्यामुळेच पारंपरिक पांढऱ्या रंगाशिवाय रंगीबेरंगी गाठीही बाजारपेठेत विक्रीसाठी आणले आहेत.

भरीव गाठींसह पोकळ गोलाकार, “स्टार’आकारासह फुलांच्या आकारातील गाठी बाजारात उठून दिसत आहेत.गुढीच्या खरेदीबरोबरच मुहूर्ताला नवीन वस्तूची खरेदी अनेक जण हौसेने करतात. यामध्ये फ्रीज, टीव्ही, मायकोव्हेव्ह आदी घरगुती गोष्टी घेण्यासह नवीन गाडी, घर खरेदीकडेही नागरिकांचा कल असतो. नववर्षाच्या स्वागताला गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पाडव्याला “सिझन’च्या पहिल्या आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे घरातील मानाचे स्थान पटकावण्यासाठी “फळांचा राजा’ दाखल झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.