“बी’ टीम म्हणून हिणविणे ही कोतीवृत्ती – पाटील

सोमवारी करणार अर्ज दाखल
मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील आणि शिरुर लोकसभेचे उमदेवार राहुल ओव्हाळ सोमवारी (दि.8) सकाळी अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिली.

पिंपरी – वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रस्थापित राजकीय पक्षयांच्या पदाधिकाऱ्यांकडून या आघाडीला भाजपची बी टीम म्हणून हिणवणे, ही कोतीवृत्ती आहे, असा आरोप मावळ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी केला. स्वत:च्या पक्षातील जाणत्या पदाधिकाऱ्यांची स्वप्ने नाकारुन त्यांच्यावर घराणेशाही लादली जात आहे, असा आरोपही त्यांनी पवार कुटुंबियांवर केला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.4) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शिरुर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ, माजी नगरसेवक रामचंद्र माने, अंकुश कानडी तसेच सुरेश गायकवाड, रजनीकांत क्षीरसागर, राहुल इनकर, राजेश बारसागडे, के.डी. वाघमारे, सनी गायकवाड, भिमाताई तुळवे, रुहीनाज शेख आदी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पाटील यांच्या नावाची घोषणा होऊन कित्येक दिवस उलटले आहेत, परंतु शहरात मात्र वंचित बहुजन आघाडी सक्रिय दिसत नव्हती. महापालिकेच्या निवडणुकीत जंग-जंग पछाडणारे एमआयएम देखील लोकसभा निवडणुकीत खूपच शांत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप तरी चर्चेत नाही. अखेर पाटील यांनी पिंपरीत येऊन पत्रकार परिषद घेत आपणही मैदानात असल्याची जाणीव भारिप बहुजन महासंघ व एमआयएमच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करुन दिली. पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांवर शरसंधान केले. कित्येक राज्य पातळीवरील मुद्दयांसोबत त्यांनी स्थानिक मुद्दयांवरुनही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.