मंचर -आंबेगाव तालुक्यात मंगळवारी (दि. 26) पिंगळवाडी (लांडेवाडी) व वडगाव काशिंबेग येथे असे दोन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. मुंबई येथून आलेल्या 42 व 47 वर्षीय वयोगटातील पुरुषांचा वैद्यकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. आता तालुक्यात करोना बाधितांची संख्या आठ झाली आहे.
सुरुवातीला साकोरे या गावात पहिला करोना बाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर शिनोली येथे दुसरा रुग्ण सापडला. निरगुडसर, जवळे व शिनोली या गावांमध्ये एकाच दिवशी चार रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या सहावर गेली होती. मंगळवारी पिंगळवाडी येथे 42 वर्षाचा वडगाव काशिंबेग येथे 47 वर्षीय अशा दोन व्यक्ति करोना बाधित आढळून आल्याने एकूण आठ करोना बाधित झाले आहेत.
प्रशासनाने या व्यक्तींना तपासणीसाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी त्यांची करोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा वैद्यकीय अहवाल मंगळवारी आला. तहसिलदार रमा जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी तत्परतेने संबंधित गावांना भेटी दिल्या आहेत.
विशेष म्हणजे तालुक्यात जे करोना बाधित सापडले आहे ते सर्वजण मुंबईतून आलेले आहे. त्यामुळे मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांना रोखण्यात यावे. अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.