वाघोली -येथील 4 नंबर खाण परिसरामध्ये आरएमसी प्लांट जवळ असणाऱ्या लेबर कॅम्पमधील 20 वर्षीय कामगार महिलेला करोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वी तिला प्रसूतीसाठी वाघोली येथून ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने एका बाळाला जन्म दिला आहे. महिलेची व बाळाची करोना टेस्ट केली असता महिला पॉझिटिव्ह निघाली तर बाळ निगेटिव्ह आले आहे. तिच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला वास्तव्यास असणाऱ्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली असून त्यांचा इतर लोकांशी फारसा संपर्क आलेला नाही. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत करोनाचे 13 रुग्ण सापडले असून यापैकी सातजण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 6 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.